
गडचिरोली., 23 डिसेंबर (हिं.स.) :
एसटी बसच्या अनियमिततेचा आणि प्रशासकीय उदासीनतेचा फटका बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी पोर्ला येथे आक्रमक पवित्रा घेतला. बस वेळेवर येत नाही आणि आलीच तर थांब्यावर थांबत नाही, या त्रासाला कंटाळून शेकडो विद्यार्थ्यांनी गडचिरोली-आरमोरी महामार्गावर ‘चक्काजाम’ केला. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुमारे ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
गेल्याच आठवड्यात १७ डिसेंबर रोजी किटाळी येथे विद्यार्थ्यांनी अशाच मागणीसाठी रस्ता अडवला होता. त्यावेळी प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते, मात्र त्याचे पालन झाले नाही. पोर्ला परिसरातील विद्यार्थी आरमोरी आणि देऊळगाव येथे शिक्षणासाठी जातात. अनेकदा बस चालक थांब्यावर बस थांबवत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गडचिरोली जिल्हा वनव्याप्त असून सध्या या परिसरात वाघाची मोठी दहशत आहे. बससाठी तासनतास थांब्यावर उभे राहणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा जवळ येत असताना वर्ग बुडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
विद्यार्थ्यांच्या या अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. तासनतास वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाही विद्यार्थ्यांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ का येते? असा सवाल यावेळी पालकांनी उपस्थित केला.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला. “प्रत्येक बस थांब्यावर थांबेल आणि बससेवा सुरळीत केली जाईल,” असे ठोस आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, प्रशासनाने पुन्हा आश्वासन पाळले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थी आणि पालकांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond