
लासलगाव, 23 डिसेंबर (हिं.स.)। बांग्लादेशसह परदेशात कमी प्रमाणात होत असलेली कांद्याची निर्यात आणि कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह देशांतर्गत बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन लाल कांद्याची आवक होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात लक्षणीय घसरण झाली आहे. या दरघसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यातील सोमवारच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात प्रतिक्विंटलमागे सुमारे ५०० रुपयांची, तर संपुष्टात येत असलेल्या जुन्या उन्हाळी कांद्याच्या दरात सुमारे ८४९ रुपयांची घसरण झाली असून परिणामी लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार रुपयांच्या आत येत सुमारे १,८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तसेच उन्हाळी कांद्याचे दरही १,२०० रुपयांच्या आत घसरत सरासरी १,२५१ रुपयांपर्यंत आले आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची सुमारे १,४११ वाहनांमधून २१ हजार २५४ क्विंटल आवक झाली. या कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त २,६९० रुपये, किमान ५०० रुपये तर सरासरी १,८०० रुपये दर मिळाला. त्याचप्रमाणे उन्हाळ कांद्याची सुमारे २८ वाहनांमधून ४२८ क्विंटल आवक झाली असून या कांद्याला जास्तीत जास्त १,७०० रुपये, किमान ५०० रुपये आणि सरासरी १,२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. निर्यातीतील मर्यादा आणि वाढती आवक कायम राहिल्यास येत्या काळात कांद्याच्या दरांवर आणखी दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे शेतकऱ्यांमधील चिंतेचे वातावरण अधिक गडद होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV