
रत्नागिरी, 23 डिसेंबर, (हिं. स.) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोकण प्रांत वर्ष २०२५-२६ साठी प्रांत अध्यक्ष म्हणून वैद्य कैलास सोनमनकर यांची निवड करण्यात आली. प्रांत मंत्री म्हणून राहुल राजोरिआ यांची फेरनिवड झाल्याची घोषणा निर्वाचन अधिकारी डॉ. शेखर वसंत चंद्रात्रे यांनी मुंबईत केली.बोरिवली येथे दि. २५ ते २७ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोकण प्रांताच्या ६० व्या प्रांत अधिवेशनामध्ये निर्वाचित प्रांत अध्यक्ष आणि प्रांत मंत्री आपापला पदभार स्वीकारतील.
वैद्य कैलास सोनमनकर १९९२ पासून अभाविपच्या कार्यात आहेत. बीएएमएस, एमडीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे. वरळी येथील रामविलास आनंदीलाल पोदार वैद्यकीय महाविद्यालय (आयुर्वेदिक) येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. विद्यार्थिदशेत नांदेड शाखेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत वैद्यकीय शिक्षण विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रांत निमंत्रक ही जबाबदारी त्यांनी पार पाडली. महानगर कार्यकारिणी सदस्य, मुंबई महानगर अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या मुंबई दक्षिण विभाग प्रमुख आणि कोकण प्रांत उपाध्यक्ष अशी जबाबदारी आहे. वर्ष २०२५-२६ साठी कोकण प्रांत अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली असून त्यांचा निवास ठाणे येथे आहे.
राहुल गिरिधारी राजोरिआ हे मूळचे रत्नागिरीचे कार्यकर्ता आहेत. ते २०१७ पासून अभाविपच्या संपर्कात असून २०२३ पासून विद्यार्थी पूर्णवेळ म्हणून कार्यरत आहेत. कला शाखेत राज्यशास्त्र व ग्रामीण विकास पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी घेतले आहे. यापूर्वी रत्नागिरी शहर मंत्री, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक व रत्नागिरी विभाग संयोजक अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. २०१९ मध्ये कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि भारताच्या एकतेतील विविधतेचा संदेश देणाऱ्या ऐतिहासिक ११११ फुटाची तिरंगा यात्रेचे नेतृत्व केले आहे. २०२१ कोविडच्या काळामध्ये विविध सेवाकार्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. २०२२ मध्ये विकासार्थ विद्यार्थी माध्यमातून १ कोटी वृक्षारोपण आणि संवर्धन मोहिमेचा प्रमुख म्हणून विविध महाविद्यालयांवर प्रवास आणि २०२४ मध्ये अभाविपच्या कोंकण विकास यात्रेचे नेतृत्व करत विद्यार्थ्यांमध्ये कोकण किनाऱ्याचा शाश्वत विकास आणि त्यांची भूमिका या विषयात जनजागरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सध्या प्रांत मंत्री आणि विभाग संघटन मंत्री अशी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. केंद्र पनवेल आहे. वर्ष २०२५-२६ साठी कोकण प्रांत मंत्री म्हणून यांची फेरनिवड झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी