कोल्हापूर - किणी येथे मध्यरात्री आराम बसवर दरोडा; सव्वा कोटीची लूट
कोल्हापूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। पुणे-बेंगलोर महामार्गावर किणी टोल नाक्या जवळ कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी आराम बसवर मध्यरात्री ५ ते ६ जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये १ कोटी २० लाख रुपये किंमतीची ६० किलो चांदी, सोने आणि रोख रक्कम अशी
किणी येथे बसवर दरोडा


कोल्हापूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। पुणे-बेंगलोर महामार्गावर किणी टोल नाक्या जवळ कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी आराम बसवर मध्यरात्री ५ ते ६ जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये १ कोटी २० लाख रुपये किंमतीची ६० किलो चांदी, सोने आणि रोख रक्कम अशी दरोडेखोरांनी सव्वा कोटीची लूट केली. यातील 4 दरोडेखोरांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून लुटीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमध्ये ट्रॅव्हल्सचा क्लिनरच मास्टरमाइंड असल्याचे निष्पन्न झाले आहे.

किणी टोलनाक्यापासून काही अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला असून, या घटनेमुळे व्यापारी वर्गात आणि प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांचे सोने-चांदी कोल्हापूरहुन मुबंईला अंगडिया सर्व्हिसेसद्वारे नेण्यात येत असते. सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईसाठी अशोका ट्रॅव्हल्सची बस रवाना झाली. या बसमध्ये आधीच तिघे संशयित प्रवासी म्हणून बसले होते. बस किणी टोलनाक्याच्या परिसरात पोहोचताच, बसमध्ये बसलेल्या तिघांपैकी एकाने चालकाच्या गळ्याला चाकू लावला आणि गाडी थांबवण्यास भाग पाडले. बस थांबताच मागून आलेल्या एका कारमधून दरोडेखोरांचे इतर साथीदार तिथे पोहोचले. दरोडेखोरांनी बसच्या डिकीतील ६० किलो चांदी (सुमारे १ कोटी २० लाख रुपये), एक तोळा सोने आणि रोख रक्कम असा एकूण सव्वा कोटींचा ऐवज अवघ्या काही मिनिटांत कारमध्ये भरला आणि पसार झाले.

घटनेनंतर चालकाने तत्काळ ट्रॅव्हल्स मालकाला माहिती दिली. यानंतर पेठवडगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरोडेखोर आधीच प्रवासी म्हणून बसमध्ये बसले असल्याने, या गुन्ह्यात रेकी झाल्याचा दाट संशय आला. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीसानी दरोडेखोरांचा शोध घेतला.

अवघ्या 8 तासात पोलिसांनी तपास करून 4 दरोडेखोरांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून लुटीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमध्ये ट्रॅव्हल्सचा क्लिनरच मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande