
अमरावती, 23 डिसेंबर (हिं.स.)। शहरात सुरू असलेल्या विजयाच्या जल्लोषाला अचानक रक्तरंजित वळण मिळाले. जल्लोषादरम्यान झालेल्या वादातून मोहम्मद जाकीर शेख नजीर यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंजनगाव सुर्जी येथे घडली. या प्रकरणातील १२ आरोपी फरार असून शहरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विजयाच्या आनंदात जल्लोष सुरू असताना दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढत जाऊन हाणामारीत रूपांतरित झाला. याच दरम्यान मोहम्मद जाकीर शेख नजीर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार असलेल्या १२ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
अंजनगाव सुर्जी ठाणेदार सुरज बोंडे यांनी सांगितलं की, सदर सर्व आरोपी फरार असून आरोपीचा शोध घेण्याकरता दोन पथक तयार करण्यात आली आहे. लवकरच आरोपी अटक करण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी