
अकोला, 24 डिसेंबर (हिं.स.)। अकोल्याच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या विमान पायलट प्रशिक्षण केंद्राला अखेर मंजुरी मिळाली असून, या महत्त्वपूर्ण यशाचे श्रेय खासदार अनुप धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला जाते.
अकोला ही आधीच शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखली जाते या प्रशिक्षण केंद्रामुळे अकोल्याची शैक्षणिक ओळख अधिक भक्कम झाली आहे.आता या विमान पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अकोल्याच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळणार असल्याचा विश्वास खासदार धोत्रे यांनी व्यक्त केला आहे.
हे पायलट प्रशिक्षण केंद्र येत्या चार महिन्यांत सुरू होणार असून, केंद्र सरकारने संबंधित संस्थेला अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे पश्चिम विदर्भातील युवकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. अकोल्यातील विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षणासाठी मुंबई, चेन्नईसारख्या महानगरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही, आणि स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमी अधिग्रहणाचे काम सुरू केले असून, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची यासंदर्भात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देत अकोल्यातील हवाई पट्टी व विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
हे पायलट प्रशिक्षण केंद्र म्हणजे अकोल्याच्या विकासाला नवी दिशा देणारी नववर्षाची मोठी भेट असून, रोजगार, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे