
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)
एम.डी. ड्रग्ज विकणाऱ्या दोन युवकांना गुन्हेशाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ऑक्सीजन पार्क येथून ताब्यात घेतले. अंगझडतीत त्यांच्याजवळ ६ लाख १ हजार रुपयांचे ५७ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज आढळले. ते जप्त करून त्यांना फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले.स्वदेश विरेंद्र कुमार (वय २६ रा. कैलासनगर) आणि शेख मोहसीन शेख सलीम (वय ३० रा. हबीबनगर) अशी त्यांची नावे आहेत. शेख शहजाद उर्फ गड्डू तुफान (रा. गौसनगर) आणि शेख शाहरुख शेख नासीर (रा. लालखडी) अशी पसार आरोपींची नावे आहेत.
गुन्हेशाखेच्या पथकाला दोन युवक ऑक्सीजन पार्कजवळ एम.डी. ड्रग्ज विक्री करण्याकरीता येत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी ऑक्सीजन पार्क परिसरात सापळा रचला. दरम्यान सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दोन युवक येताना दिसले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्याजवळ ५७ ग्रॅम एम.डी आढळली. एम.डी. ड्रग्ज त्यांना कोणी दिली, याबाबत विचारपूस केली असता त्यांनी शेख शाहरूख व शेख शहजाद यांची नावे सांगितली.या घटनेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली.
या कारवाईत पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि महेश इंगोले, पोलीस अंमलदार गजानन ढेवले, मनोज ठोसर, फिरोज खान आदींचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी