मुलांना खरा ‘सांता क्लॉज’ दाखवा; हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आवाहन
अकोला, 24 डिसेंबर, (हिं.स.)। ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर समाजात रूढ झालेल्या ‘सांता क्लॉज’ या काल्पनिक संकल्पनेमुळे लहान मुलांच्या मनावर चुकीचे संस्कार होत असल्याबाबत चिंता व्यक्त करत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एक
P


अकोला, 24 डिसेंबर, (हिं.स.)। ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर समाजात रूढ झालेल्या ‘सांता क्लॉज’ या काल्पनिक संकल्पनेमुळे लहान मुलांच्या मनावर चुकीचे संस्कार होत असल्याबाबत चिंता व्यक्त करत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन याविषयी आपली ठाम भूमिका मांडली. समितीअंतर्गत झालेल्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी परस्पर चर्चा करून सामूहिक निर्धार व्यक्त केला,मुलांना भुलवू नका; खरा ‘सांता क्लॉज’ दाखवा, १ लाख मिळवा ! असे आवाहन हिंदु राष्ट्र समन्वय समिती तर्फे करण्यात आले.

बैठकीदरम्यान, ‘सांता क्लॉज’ ही संकल्पना ऐतिहासिक वा धार्मिकदृष्ट्या सत्य नसून ती बाजारपेठेने निर्माण केलेली भ्रामक कल्पना असल्याचे मत मांडण्यात आले. हिंदु समाजातील पालकांनी कोणतीही चिकित्सक भूमिका न घेता ही कथा मुलांना सांगणे म्हणजे लहान वयातच त्यांना अंधश्रद्धेच्या दिशेने नेणे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. विशेषतः हिंदु देवता, परंपरा व श्रद्धांवर टीका करणारे काही तथाकथित पुरोगामी घटक या बाबतीत मौन का बाळगतात, असा सवालही बैठकीत उपस्थित करण्यात आला.

यावेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे अकोला संयोजक श्री. उदय जी महा, अधिवक्ता श्री. मुकुंद जालनेकर, अधिवक्ता सौ. श्रुती भट, श्री. धनंजय मेहसरे, श्री. प्रशांत पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल वानखडे उपस्थित होते. सर्वांनी एकमताने असे मत नोंदवले की, हिंदु समाजाने आपल्या मुलांवर लहानपणापासूनच आपल्या संस्कृतीनुसार मूल्यसंस्कार करणे आवश्यक आहे.

बैठकीत सहभागी पदाधिकाऱ्यांनी “खरा ‘सांता क्लॉज’ अस्तित्वात आहे, हे सिद्ध करा आणि बक्षीस मिळवा” या आवाहनाला पाठिंबा दर्शवत, समाजप्रबोधनाच्या माध्यमातून या विषयावर जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदु समाजालाच सातत्याने लक्ष्य केले जात असल्यास, त्यावर वैचारिक पातळीवर उत्तर देणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी मांडण्यात आले.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने येत्या काळात पालकांमध्ये जागृती निर्माण करणारे उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande