
अकोला, 24 डिसेंबर (हिं.स.)। अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीवर आज अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्तपणे युतीची अधिकृत घोषणा केली. आगामी निवडणुकांमध्ये उबाठा आणि मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली असून, ठाकरे कुटुंबातील दोन प्रमुख नेते एकत्र आल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युतीच्या घोषणेनंतर राज्यभरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अनेक ठिकाणी जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
अकोला शहरातही मनसे आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून, घोषणा देत आणि एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.ठाकरे बंधूंच्या युतीमुळे आगामी निवडणुकांत राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे