
अकोला, 24 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात सौर ऊर्जेचा वापर वाढविणे ही काळाची गरज असून पर्यावरण संरक्षणासोबतच शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.
त्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह निमित्त नियोजन भवन येथे ऊर्जा बचत काळाची गरज ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व व सध्याची शासनाची धोरणे या विषयावर आधारित कार्यशाळेत बोलत होत्या.
यावेळी महाऊर्जा जिल्हा व्यवस्थापक विजय काळे,ऊर्जा व्यवस्थापन परीक्षक अच्युत मेहंदळे व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर १५० किलोवॅट पारेषण संलग्न सौर विद्युत निर्मिती प्रकल्प सुरू झाल्यामुळे वीजबिलात बचत होत असून ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भरता साधण्यासाठी हा महत्वाचा टप्पा ठरत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सौर व हरित ऊर्जेचा स्वीकार करून हरित आणि उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे.
ऊर्जा परीक्षक श्री. मेहेंदळे म्हणाले की, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि ऊर्जा गरजा लक्षात घेता पारंपरिक ऊर्जास्रोतांवरचा ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा हा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन हवामान बदलाच्या समस्येवर नियंत्रण मिळविता येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे