
अकोला, 24 डिसेंबर (हिं.स.)। बांगलादेशातील माइमेंसिंग जिल्ह्यात दीपू चंद्र दास (वय २७) या हिंदू युवकावर अत्यंत निर्घृण हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येनंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाने संपूर्ण उपखंडात खळबळ उडाली आहे.
सदर हल्ला ब्लास्फेमी (धर्मनिरपेक्षतेच्या आरोप) कारणावरून करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेमुळे भारत व बांगलादेश या दोन्ही देशांतील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद तसेच जम्मू-काश्मीरसह देशातील अनेक शहरांमध्ये हजारो नागरिकांनी रॅली व निदर्शने केली. बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या कथित अत्याचारांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
दरम्यान, अकोला शहरातही हिंदू संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते.
आंदोलकांनी बांगलादेशचे मोहम्मद युनूस तसेच दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करत बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर हस्तक्षेप व्हावा अशी ठाम मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे