
देवेंद्र फडणवीस हेच विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबई करू शकतात- बावनकुळे
मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)। युती जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी आत्मविश्वास व्यक्त करत मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असे ठामपणे सांगितले. या घोषणेनंतर भाजपकडून लगेचच प्रतिक्रिया उमटली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर तीव्र शब्दांत टीका केली. महाराष्ट्रात भावनिक आवाहन चालणार नाही, मुंबईतील जनता सुजाण आहे, असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस हेच विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबई करू शकतात, असा दावा केला. आम्ही सगळेच मराठी आहोत, काय आम्ही लंडनमधून आलो आहोत का, असा सवाल करत महायुतीत सर्वच मराठी असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
ठाकरे बंधूंवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, सावरकरांचा आणि मराठीचाही अपमान या लोकांनी केला आहे. यांना फक्त किंचित बहुमत मिळणार आहे. आतापर्यंत उत्तर भारतीयांना उद्देशून बोलणे, भूमिकांमध्ये सतत बदल करणे, अशी उदाहरणे देत त्यांनी ठाकरे बंधूंवर ‘सरड्यासारखे रंग बदलतात’ अशी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असल्याचा आरोप करत धाराशिवमध्ये ओमराजे जिंकल्यानंतर आणि नाशिकमध्ये उमेदवार जिंकल्यानंतर पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेल्याचेही त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस कधीही जात-धर्माच्या आधारावर राजकारण करत नाहीत, तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
ठाकरे गटाचे राजकीय अस्तित्व संपत चालले असून पायाखालची जमीन सरकली आहे, असा आरोप करत त्यांनी सांगितले की आता फक्त आठ लोक निवडून आले आहेत. शिंदे गटाकडे चांगले नगराध्यक्ष आहेत, उबाठामधील अनेक लोक तिकडे गेले आणि ते निवडूनही आले, असेही ते म्हणाले.
दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर कवितेच्या माध्यमातून टीका करत राजकीय भूमिका बदलण्यावर बोट ठेवले. मातोश्री, पक्षताबा, कारकून, जुनी भाषणे आणि पालिकेची तिजोरी यांचा उल्लेख करत त्यांनी मुंबईकर तुमचे जुने व्हिडीओ काढून आरसा दाखवतील, असा टोला लगावला. एकत्र येण्यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न मुंबईकर विचारतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ठाकरेंच्या युतीवर भाजप नेते आशिष शेलार यांची कवितेतून प्रतिक्रिया
घेरलं होतं मातोश्रीवरील विठ्ठलाला बडव्यांनी..
तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी...
एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचे नव्हते भागीदार
सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केले होते खुमासदार !
आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का?
त्यांच्यासोबत बेमालूमपणे भागीदार होणार का?
लाव रे तो व्हिडीओ असे आता मुंबईकर म्हणतील
तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील!
तुमचा चेहरा बघून तुम्हाला भीती नाही ना वाटणार?
एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार?
मुंबईकर गल्लोगल्लीत तुम्हाला विचारणार...
नेमके कशासाठी झाला होतात त्यावेळी वेगळे?
नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती आणि त्यावर भाजपकडून होणारी आक्रमक टीका यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule