
जळगाव , 24 डिसेंबर (हिं.स.)वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगर परिसरात राहणाऱ्या एका मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. खडी-कच आणण्यासाठी जात असताना किन्ही गावाजवळ ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलथल्याने बाप आणि चिमुकल्या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात आणखी एक मजूर गंभीर जखमी झाला असून, घटनेनंतर नातेवाइकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिध्देश्वर नगर येथील रहिवासी आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे संजय श्रावण साबळे (वय ४८) हे सकाळच्या सुमारास अक्षय संतोष मोरे (वय २७) यांच्यासह ट्रॅक्टरने खडी-कच घेण्यासाठी तालुक्यातील किन्ही गावाकडे निघाले होते. यावेळी संजय साबळे यांनी आपला सात वर्षांचा मुलगा भुषण संजय साबळे यालाही सोबत घेतले होते. किन्ही गावाच्या हद्दीपासून काही अंतरावर असताना ट्रॅक्टरचा ताबा सुटून तो अचानक रस्त्याच्या कडेला उलथला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने संजय साबळे आणि त्यांचा मुलगा भुषण यांचा जागीच करूण अंत झाला. अपघातात अक्षय मोरे गंभीर जखमी झाला असून, त्याला तत्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेमुळे सिध्देश्वर नगर परिसरात शोककळा पसरली असून, साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर