
अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.) शिवसेना–मनसे युतीवर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार टीका केली आहे. दोन भाऊ एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट असली, तरी ही एकत्रीकरणाची प्रक्रिया केवळ राजकीय स्वार्थासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये सेना–मनसेचा शेवटच्या क्रमांकावर निकाल लागत असल्याचे वास्तव असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ज्या पक्षाकडे कधीकाळी मुख्यमंत्री बनवण्याची ताकद होती, तो पक्ष आता संपुष्टात आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना प्रश्न विचारत त्यांनी सांगितले की, पूर्वी राज ठाकरे “माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो” असा नारा देत होते, मात्र उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर आता ते “महाराष्ट्राचे माझे सर्व मतदार” असे बोलत आहेत. या दोन भूमिकांमध्ये मोठा विरोधाभास असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नवनीत राणा म्हणाल्या की, ते चादर चढवणारे आहेत आणि त्यांना मतदान करणारेही तसेच आहेत. मग आता भोंगे, मशिदीविरोधातील भूमिका आणि हनुमान चालीसा कुठे गेली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले की, आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सर्व राजकीय दुकानदारी बंद होणार असून, महानगरपालिकेत फक्त भाजपचा आणि भगव्याचा झेंडा फडकणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी