
नांदेड, 25 डिसेंबर (हिं.स.)।माहूर तालुक्यातील बामनगुडा (गोंडखेडी) शिवारात कापूस वेचणीदरम्यान एका महिलेवर अस्वलाने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात लता सुरेश तोडसाम (वय ३५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या चेहरा, कपाळ व मानेवर खोल जखमा झाल्या आहेत. सोबत असलेल्या चिमुकल्याने आणि मजुरांनी केलेल्या धाडसी आरडाओरड्यामुळे अस्वल जंगलात पळून गेले आणि महिलेचे प्राण थोडक्यात वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, लता तोडसाम या मुलगा व एका मजुरासोबत शेतात काम करत होत्या. त्यांचे पती काही कामानिमित्त घरी गेले असतानाच, शेतालगतच्या घनदाट जंगलातून अस्वलाने अचानक झडप घातली. चेहऱ्यावर थेट हल्ला केल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. प्रसंगावधान राखत मुलगा व मजुरांनी जोरात आरडाओरड केल्याने अस्वलाने महिलेला सोडून जंगलात धूम ठोकली.
घटनेची माहिती मिळताच पती सुरेश तोडसाम यांनी पत्नीला सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात, तेथून माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमा गंभीर असल्याने डॉक्टरांनी १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मांडवीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष सिरसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. अस्वलाच्या पाऊलखुणा व विष्ठेचे नमुने आढळून आले असून पंचनामा करण्यात आला आहे. जखमी महिलेला शासकीय नियमानुसार जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.या घटनेमुळे बामनगुडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हिंस्र अस्वलाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis