
छत्रपती संभाजीनगर, 24 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा देशात सलग चार वर्ष प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या उपक्रमात प्रथम क्रमांकावर असून हा प्रथम क्रमांक कायम ठेवण्यासाठी योजनेचे प्रलंबित प्रस्ताव डिसेंबर अखेर मंजूर करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
जिल्हास्तरीय बँकर समितीच्या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक प्रेषित मोघे, कृषी विभागाचे उपसंचालक दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, रिझर्व बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अमित मिश्रा, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा व्यवस्थापक विक्रम सरगर, सुचिता कोतकर ,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक एस. जे. पाटील तसेच सर्व बँकेचे समन्वयक या बैठकीसाठी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषी आधारित विविध उपक्रम आणि प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात येत आहे. यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा सातत्याने चार वर्षापासून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये प्रथम क्रमांक वर आहे. यावर्षीही तो प्रथम क्रमांकावर असावा. यासाठी प्रलंबित प्रस्ताव परिपूर्ण करून संबंधित बँकेने तात्काळ प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश स्वामी यांनी दिले. जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार मिळावा यासाठी विविध बँकांच्या कर्ज योजनेचा लाभ शेतकरी, तरुणांना द्यावा.
यासाठी प्रशिक्षण आणि योग्य ते मार्गदर्शन बँकेमार्फत करण्यात यावे असेही आवाहन यावेळी बँकर समितीच्या सदस्यांना करण्यात आले. कृषी उत्पादन वाढी बरोबरच प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या ची निवड करण्यात आलेली आहे. यामध्येही मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन जिल्ह्यातील कृषी उत्पादनाला बाजारपेठ आणि उत्पादन वाढीसाठीचे आवश्यक ते मार्गदर्शन आणि निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्येही बँकेने सक्रिय सहभाग घेऊन कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, दुग्ध व्यवसाय आणि रेशीम उत्पादनासाठी ही प्रयत्न केले जाणार आहेत या संदर्भातल्या सर्व व्यवसायसाठी लागणारा कर्ज पुरवठा वेळेत करण्यात यावा, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक प्रेषित मोघे यांनी विविध योजनांचा आढावा व त्यातील लक्षांक याविषयी सादरीकरण केले .प्रलंबित प्रस्तावा बाबत संबंधित बँकेच्या प्रतिनिधी यांनी प्रस्ताव तात्काळ मंजूर करून कर्ज पुरवठा वितरित करण्याचे निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis