
मुंबई, २४ डिसेंबर (हिं.स.) : माजी मंत्री, ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील अनुभवी, लोकाभिमुख, संवेदनशील व मार्गदर्शक नेतृत्व हरपले असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे एक लढवय्ये नेतृत्व होते. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत विविध खात्यांचा कार्यभार अत्यंत समर्थपणे सांभाळला. आदिवासी विकास, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण व कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हितासाठी त्यांनी अखंडपणे कार्य केले. नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. साधी जीवनशैली आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ यामुळे ते ‘जनतेचे आमदार’ म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एका अनुभवी, लोकाभिमुख आणि संवेदनशील नेत्याच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. आदिवासी, ग्रामीण व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, असे नमूद करत नाईक कुटुंबीयांना व कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी