
रत्नागिरी, 24 डिसेंबर, (हिं. स.) : महिला बचतगटांनी पारंपरिक उत्पादनाला नावीन्याची जोड दिली आहे. कोकणच्या मेव्याला वैविध्य आणत विविध पदार्थ बनविले आहेत. गार्मेंट क्लस्टर, पॅकेजिंग क्लस्टर सुरू होत आहे. सरसच्या माध्यमातून महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. २८ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी. मनसोक्त खरेदी करून महिलांचा उत्साह वाढवावा त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमती रानडे यांनी फित कापून केले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे, सरपंच कल्पना पकये, श्री क्षेत्र देवस्थानचे सरपंच नीलेश कोल्हटकर, गटविकास अधिकारी चेतन शेळके, मंडणगड गटविकास अधिकारी सुनील खरात आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना श्रीमती रानडे म्हणाल्या, पारंपरिक उत्पादनाबरोबरच महिला बचतगटांनी नावीन्याची जोड दिलेली आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमध्ये हिरकणीसारख्या बचतगटांने प्रथम क्रमांक मिळविला आहे. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा पादाक्रांत करीत आहेत. २८ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शन व विक्रीचा सर्वांनी आस्वाद घ्यावा. विशेषत: खाद्यपदार्थांची रुचकर मेजवानी घ्यावी. महिलांचा उत्साह वाढविण्याचे काम करावे.
प्रकल्प संचालक श्री. जाधव यांनी प्रास्ताविक करून उमेद बचतगटांविषयी सविस्तर माहिती दिली. सुरुवातीला राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. साक्षी वायंगणकर यांनी आभार प्रदर्शन केले तर शमिका नागवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी सर्व स्टॉलची पाहणी करून महिलांना शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी