आदिवासींच्या न्याय हक्कांसह विकासासाठी सातत्याने कार्यरत लोकाभिमुख नेतृत्व हरपले - हर्षवर्धन सपकाळ
मुंबई, २४ डिसेंबर (हिं.स.) : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. नाईक हे काँग्रेसचे निष्ठावान पाईक होते, आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही. आदिवासी समा
आदिवासींच्या न्याय हक्कांसह विकासासाठी सातत्याने कार्यरत लोकाभिमुख नेतृत्व हरपले - हर्षवर्धन सपकाळ


मुंबई, २४ डिसेंबर (हिं.स.) : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. नाईक हे काँग्रेसचे निष्ठावान पाईक होते, आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. नाईक यांच्या निधनाने आदिवासांच्या न्याय हक्कासाठी लढाणारे खंदे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोकसंदेशात हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, सुरुपसिंग नाईक यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुकवेल गट ग्रामपंचायतीच्या सरंपचपदापासून सुरुवात केली होती. १९७८ पासून त्यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९७२ ते १९८१ या काळात त्यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९८२ साली नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली होती. समाजकल्याण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, वन आणि बंदरे खात्यांचे मंत्री खात्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर या आदिवासी तालुक्यात त्यांनी शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे करून आदिवासी युवकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, एमआयडीसीची स्थापना करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. नाईक यांचा दांडगा जनसंपर्क होता तसेच जनसामान्यासाठी ते सदैव कार्यरत असत. सुरुपसिंग नाईक यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

सुरुपसिंग नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नाईक कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande