
जळगाव , 24 डिसेंबर (हिं.स.) महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला मंगळवारपासून औपचारिक सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जांची विक्री जोरात झाली. सकाळी अकरा वाजता अर्ज विक्री सुरू होताच प्रभागनिहाय कक्षांबाहेर इच्छुकांची झुंबड उडाली. अवघ्या चार तासांत तब्बल ७७७ अर्जांची विक्री झाल्याने महापालिकेच्या तिजोरीत ७७ हजार ७०० रुपयांचा महसूल जमा झाला. मात्र, अर्ज दाखल करण्याबाबत उमेदवारांनी सावध भूमिका घेतल्याने पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. तब्बल ३९ पानांचा उमेदवारी अर्ज भरताना एखादी चूक झाली तर उमेदवारी धोक्यात येऊ शकते, या धास्तीने इच्छुकांमध्ये अस्वस्थता दिसून आली. त्यामुळे बिनचूक अर्ज भरण्यासाठी अनेकांनी वकील व सनदी लेखापालांची मदत घेण्याचा मार्ग स्वीकारला असून त्यासाठी तीन ते पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च केला जात आहे. अर्ज भरण्यास किमान दहा मिनिटांपासून ते पाच तासांपर्यंत वेळ लागत असल्याने अनेक इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण जबाबदारी तज्ज्ञांकडे सोपवली आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वारासह दुसरा व अकरावा मजला येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी तीन वाजेनंतर अर्ज विक्री थांबवण्यात आल्यानंतर पोलिसांनी इच्छुकांना दुसऱ्या दिवशी येण्याचे आवाहन केले. त्यामुळे अर्ज विक्रीच्या पुढील दिवशी पुन्हा मोठ्या गर्दीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर