
जळगाव , 24 डिसेंबर (हिं.स.) जळगाव विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर संबंधित सर्व सुरक्षा यंत्रणांची पळापळ झाली. स्थानिक पोलिसांसह बॉम्ब शोध व नाशक पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी केली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अपर जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी; औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत कार्यरत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी तातडीने सर्व नियमित कामे सोडून विमानतळावर हजर झाले. विमानतळ परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली असून, प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. संशयित वस्तू शोधण्यासाठी विशेष पथकाने सखोल तपासणी केली, तर संपूर्ण परिसराची घेराबंदी करण्यात आली. यानंतर सर्वजण प्रचंड तणावात दिसत होते. मात्र ही धमकी प्रत्यक्ष नसून सुरक्षा यंत्रणांच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी आयोजित मॉक ड्रिल असल्याचे नंतर स्पष्ट झाले. यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सद्यस्थितीत वाढत्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विमानतळासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचा प्रतिसाद किती तत्पर व प्रभावी आहे, याची प्रत्यक्ष चाचणी घेणे या सरावाचा प्रमुख उद्देश होता. या मॉक ड्रिलदरम्यान बॉम्ब ठेवल्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर अवलंबली जाणारी संपूर्ण कार्यपद्धती टप्प्याटप्प्याने राबविण्यात आली. सर्वप्रथम संभाव्य धोक्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या. विमानतळ परिसर तत्काळ सील करून संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. मॉक ड्रिलदरम्यान कोणतीही घाई गडबड किंवा गोंधळ न होता सर्व यंत्रणांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही केली. वेळेचे काटेकोर पालन, स्पष्ट संवाद व्यवस्था आणि जबाबदाऱ्यांचे योग्य विभाजन यामुळे संपूर्ण सराव यशस्वी ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर