
छत्रपती संभाजीनगर, 24 डिसेंबर (हिं.स.)। माथाडी कामगार कायदा तसेच अन्य कामगार कल्याण कायदे व योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करा व याबाबत दर आठवड्याला अहवाल सादर करा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या जिल्हास्तरीय कृती समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हा कामगार अधिकारी सुरेंद्रसिंग राजपूत, वखर महामंडळाचे अंकुश भाटेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक के. एस. पवार, कामगार संघटनांचे प्रतिनिधी सुभाष लोमटे, शेख हारुन, संतोष तळेकर आदी उपस्थित होते.
कामगारांची विविध आस्थापनांवर निवड होऊन त्यांच्या वेतनावरील लेव्ही कामगार मंडळाकडे वेळेत जमा न करणे, कामगारांच्या नियुक्त्यांसंदर्भात विविध प्रश्न, कामगारांना वेळेवर वेतन न दिल्यास दंड आकारणी करणे अशा विषयांबाबत चर्चा करण्यात आली. कामगार संघटनांनी यासंदर्भात त्यांचे प्रश्न मांडले.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, वखार महामंडळांनीही माथाडी कायद्याप्रमाणे काम करावे. कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन व अन्य लाभ मिळावे यासाठीच मंडळ आहे. कामगारांच्या हिताच्या कायद्याची अंमलबजावणी हेतूपुरस्कर न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करा,असे निर्देश त्यांनी दिले. तसेच या कारवाई संदर्भात तसेच कामगारा संघटनांच्या विविध वैध मागण्यांबाबत सरकारी कामगार अधिकारी यांनी दर आठवड्याला अहवाल सादर करावा,असे निर्देशही दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis