
रत्नागिरी, 24 डिसेंबर, (हिं. स.) : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ नवोदित वकिलांना खुले आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांनी केले.
रत्नागिरी बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. न्यायमूर्ती कडेठाणकर यांनी कोल्हापूर खंडपीठासमोरील वकिलीतील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, नवोदित वकिलांनी बुजू नये आणि घाबरूही नये. ज्युनिअर वकिलांना उच्च न्यायालयातील अनेक दालने खुली होतील. जिल्हा स्तरावरील वकिलांचा प्रोसीजर लॉ पक्का असल्याने उच्च न्यायालयात वकिली करणे त्यांना तुलनेने सोपे जाते. आपण सक्षम आहात, त्यामुळे पैशाबरोबर तुम्हाला प्रतिष्ठाही लाभेल.
न्या. कडेठाणकर यांनी वकिलांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. न्या. कडेठाणकर यांचा रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. निनाद शिंदे यांनी केले. आभार ॲड. शाल्मली आंबुलकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर न्यायमूर्ती कडेठाणकर यांनी बार रूमला भेट दिली नोबेल विजेते साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांच्या म्युरललाही भेट दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी