महाविस्तार एआय अॅप : शेतकऱ्यांसाठी ‘चालते-बोलते कृषी विद्यापीठ’
नांदेड, 24 डिसेंबर (हिं.स.) शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अचूक, वेळीच व विश्वासार्ह कृषी माहिती मिळावी, या उद्देशाने कृषी विभागाने राज्यभर ‘महाविस्तार एआय’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅप सुरू केले आहे. या अॅपमधून शेतीविषयक सल्ल
महाविस्तार एआय अॅप : शेतकऱ्यांसाठी ‘चालते-बोलते कृषी विद्यापीठ’


नांदेड, 24 डिसेंबर (हिं.स.) शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अचूक, वेळीच व विश्वासार्ह कृषी माहिती मिळावी, या उद्देशाने कृषी विभागाने राज्यभर ‘महाविस्तार एआय’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅप सुरू केले आहे. या अॅपमधून शेतीविषयक सल्ला, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, खतांच्या शिफारशी तसेच बाजारभावाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या सहकार्यातून विकसित करण्यात आलेले हे अॅप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून, त्यामध्ये मराठी भाषेतील चॅटबॉट सुविधा देण्यात आली आहे. शेतकरी या चॅटबॉटवर शेतीसंबंधी कोणताही प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे शेतीकामात निश्चितच मोठी मदत होणार आहे.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर उभी राहिलेली आव्हाने लक्षात घेऊन या अॅपच्या माध्यमातून हवामान अंदाज, पीक लागवडीच्या पद्धती, कीड व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था तसेच डीबीटीवरील विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय ऑडिओ व व्हिडीओ स्वरूपातही शेतीपूरक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

महाविस्तार एआय अॅपमध्ये फार्मर आयडी वापरून लॉगिन करता येते. फार्मर आयडी नसल्यास मोबाईल नंबरच्या सहाय्यानेही लॉगिनची सुविधा उपलब्ध आहे. खरीप पेरणीपासून ते शेतीमाल विक्रीपर्यंतची सर्व आवश्यक माहिती या अॅपवर मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.

शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘महाविस्तार एआय’ अॅप जास्तीत जास्त संख्येने डाउनलोड करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande