
अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.)।शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या पाहणीकरिता पोलीस आयुक्त राकेश ओला मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर उतरले. मात्र वाहतूक शाखेच्या तिन्ही अधिकाऱ्यांना फोन करून बोलवावे लागले. त्यामुळे आयुक्त चांगलेच संतापले होते. अमरावती शहरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून दिवसेंदिवस हा वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे. रस्त्याने पायी चालणाऱ्या व्यक्तींनासुध्दा रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. तीन महिन्यापासून रेल्वेपुल बंद असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक चौकात वाहनांच्या रांगा लागत आहे. तसेच चौकातील सिग्नल कधी बंद तर कधी सुरू राहतात आणि वाहतूक कर्मचारी सुध्दा कधीतरी दिसतात. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी मंगळवारी सायंकाळी स्वतः रस्त्यावर उतरून शहरातील वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. इर्विन चौकात त्यांना दोन कर्मचारी दिसले. परंतु एकही अधिकारी उपस्थित नव्हता. आयुक्तांनी रिडरच्या फोनवर संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर अधिकारी पोहचले. त्यावेळी आयुक्त चांगलेच संतापले होते. त्यानंतर त्यांनी नवाथे, गोपालनगर आणि बडनेरा येथील वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. शहरातील कोणत्या सिग्नलचा किती वेळ आहे याबाबत संपूर्ण माहिती घेतल्यानंतर शहरातील काही सिग्नलचे टाईम बदलविण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात एन्ट्री व एक्झीट वेगवेगळे करण्याबाबत आयुक्त लवकरच निर्णय घेणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता तत्कालीन पोलीस आयुक्त चावरिया यांनी गाडगेनगर, राजापेठ आणि फ्रेजरपुरा असे तीन वेगवेगळे विभाग केले होते आणि तिन्ही अधिकाऱ्यांना वेगवेगळे कार्यालय दिले होते. परंतु तिन्ही अधिकारी इर्विन चौकातील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयाच्या खुर्चीकरीता संगीत खुर्ची खेळतांना दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी