
परभणी, 24 डिसेंबर (हिं.स.) गंगाखेड तालुक्यातील धारखेड येथील कै. हभप रंगनाथरावतात्या चोरघडे स्मृतिग्रंथ 'वारकरी संप्रदाय : स्वरूप आणि साहित्य' ज्येष्ठ समीक्षक डॉ. बाळकृष्ण कवठेकर, डॉ. सतीश बडवे यांनी संपादित केलेल्या या स्मृतिग्रंथास नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार नुकचताच जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नागपूर येथे १४ जानेवारी २०२६ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
धारखेड येथील कै. हभप रंगनाथरावतात्या चोरघडे यांच्या निधनानंतर या स्मृतिग्रंथाची निर्मिती करण्यात आली. यासाठी मराठी साहित्यातील जेष्ठ समीक्षक डॉ.बाळकृष्ण कवठेकर व डॉ.सतीश बडवे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या लेखांचा आणि रंगनाथरावतात्या यांच्या जीवनावर डॉ. कैलास इंगळे, डॉ.जयंत बोबडे तसेच मुलगा डॉ. मुंजाजी चोरघडे यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक लेखांचा समावेश केला आहे. वारकरी संप्रदाय आणि वारकरी यांचा अनुबंध उलगडणारा हा स्मृतिग्रंथ संत साहित्यासाठी ठेवा बनला आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या स्मृतींना अजून उजाळा मिळाल्याचे वसंतराव चोरघडे, सरपंच आशाताई चोरघडे, डॉ.मुंजाजी चोरघडे, डॉ.यशवंत सोनुने, डॉ.कैलास इंगळे, डॉ. जयंत बोबडे, उद्धव चोरघडे, सुदीप चोरघडे, सुमित चोरघडे, अमेय चोरघडे आदींनी समाधान व्यक्त केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis