
रायगड, 24 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्राच्या निसर्गसौंदर्यात मोलाची भर घालणारे आणि लाखो निसर्गप्रेमींच्या गळ्यातील ताईत ठरलेले पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील ‘रामबाग’ उद्यानाचा तृतीय वर्धापनदिन सोहळा सोमवारी सायंकाळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. नयनरम्य परिसर, आकर्षक विद्युत रोषणाई आणि उत्कृष्ट नियोजनामुळे रामबाग नंदनवनासारखी खुलून दिसत होती.
या सोहळ्याला लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक आगरी-कोळी लोकगीतांच्या बहारदार कार्यक्रमामुळे वातावरणात सांस्कृतिक रंगत भरली होती. लोकसेवेसाठी स्वतःच्या संकल्पनेतून उभारलेली रामबाग आज न्हावे पंचक्रोशीसह पनवेल, उरण, नवी मुंबई आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचा अभिमान ठरली आहे. पर्यटनस्थळ म्हणूनही रामबागची ओळख दिवसेंदिवस वाढत आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामस्थ, म्हसेश्वर मंदिर समिती व रामबाग व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार, आमदार, माजी मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वर्धापनदिनानिमित्त आयोजित श्री. सत्यनारायण महापूजेचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. दुबईतील ‘मिरॅकल गार्डन’च्या धर्तीवर १४ एकर जागेत उभारलेल्या रामबागेत भव्य प्रवेशद्वार, हिरवळीने नटलेली फुलझाडांची रचना, तलाव, कारंजे, पदपथ, सेल्फी पॉइंट, मुलांसाठी खेळणी व सायंकाळची नेत्रदीपक रोषणाई विशेष आकर्षण ठरते.
प्रवेश विनाशुल्क असूनही दर्जेदार सुविधा उपलब्ध असल्याने रामबाग तीन वर्षांत लाखो पर्यटकांची पसंती ठरली आहे. निसर्ग, आरोग्य व सामाजिक सलोखा यांचा संगम साधणारे ‘रामबाग’ हे उद्यान सर्वसामान्यांसाठी आदर्श व प्रेरणादायी सार्वजनिक उद्यान म्हणून नावारूपास आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके