
रायगड, 24 डिसेंबर (हिं.स.)। कशेळे गावातून जाणाऱ्या कशेळे–मुरबाड, कशेळे–कर्जत, कशेळे–नेरळ, कशेळे–कोठीबे आणि कशेळे–खांडस या सर्व प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीची अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेत अतिक्रमण हटाव कारवाई सुरू केली आहे. रस्त्यांलगत विक्रेते व दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे बस, जड वाहने तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
बुधवारी पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, कशेळे व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त पाहणीत संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली.
कारवाईदरम्यान रस्त्यांवरील अतिक्रमण केलेले भाग रंगाने स्पष्टपणे चिन्हांकित करण्यात आले. संबंधित विक्रेते व दुकानदारांना दोन दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास थेट आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, कशेळे नाक्यावरील जुना एसटी बस थांबा देखील अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचा गंभीर मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला. बस थांब्याची जागा व्यापली गेल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांना थेट वर्दळीच्या रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
कोठीबे मार्गावरील एसटी बसला वारंवार पुढे-मागे घ्यावे लागत असून, नेरळकडे जाणाऱ्या कंटेनर व जड वाहनांना वळण घेताना मोठे अडथळे येत आहेत. खांडस मार्गावरील वळणावरही अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका वाढला असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले.
ग्रामस्थ व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविणे काळाची गरज असल्याचे सांगत, जुना एसटी बस थांबा तातडीने अतिक्रमणमुक्त करून प्रवाशांसाठी सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती व बस थांब्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके