
अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.)।
तिवसा–कुऱ्हा मार्गावरील भांबोरा लालमाती परिसरात रोही अचानक रस्त्यावर आडवे आल्याने झालेल्या दुचाकी अपघातात महेश प्रदीप पोल्हाड (वय ३०, रा. भांबोरा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी, दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे भांबोरा व परिसरात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महेश पोल्हाड हे नांदगाव पेठ येथील एमआयडीसीत सोफिया कंपनी मध्ये असल्याने ते नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी (क्रमांक एम.एच. २७ इ ए ०३६३) ने निघाले होते. शेंदूरजना बाजार ते कुऱ्हा मार्गावरील भांबोरा जवळील भागात अचानक जंगली रोही रस्त्यावर आडवे आले. या अनपेक्षित घटनेत दुचाकीची जोरदार धडक होऊन महेश पोल्हाड गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून त्यांना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले. दुर्दैवाने अमरावती येथे उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.महेश पोल्हाड यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार हरपल्याने नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी