
मुंबई, 24 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यात शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते रामदास कदम, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार यादी जाहीर करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि युवा नेते यांचा समावेश आहे. नगर परिषदांच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभर प्रचाराचा झंझावात केला होता.
नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे ६२ हून अधिक नगराध्यक्ष विजयी झाले तर ८५० हून अधिक नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. आता २९ महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेकड़ून विकासाचा अजेंडा मतदारांपुढे सादर केला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर