
ठाणे, 24 डिसेंबर (हिं.स.)। ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणुक विषयक तसेच, प्रचारासंबधी विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता ठाणे महापालिकेनेही एक खिडकी योजना कार्यन्वित केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे ठाणे महापालिका क्षेत्रात एक खिडकी योजना राबवण्याची आग्रही मागणी काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली होती.
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असल्याने सर्वच राजकिय पक्षांसह इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार लागणारे सर्व दाखले व परवानग्या आवश्यक असतात. याशिवाय अन्य विविध परवानग्या राजकिय पक्ष व उमेदवारांना सहज उपलब्ध होणे गरजेचे असते. अत्यंत तोकड्या वेळात अनेक गोष्टी जमवायच्या असल्यामुळे उमेदवार अक्षरशः मेटाकुटीला येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये मिळण्यासाठी एक खिडकी योजना कक्ष सुरू करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. मनसेच्या मागणीचा सकारात्मक विचार करून प्रशासनाने एक खिडकी योजना सुरु केली आहे.
त्यानुसार, प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयांमध्ये एक याप्रमाणे एकूण नऊ व ठाणे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र येथे एक अशा एकूण १० खिडक्या उघडण्यात आल्या आहेत. या एक खिडकी योजनेमुळे निवडणुकीसाठी उमेदवार, राजकीय पक्ष यांना सभा व प्रचाराकरिता परवानगी, मैदानाची परवानगी, ध्वनीक्षेपक परवानगी, रॅली, बोर्ड-बॅनर लावण्याची परवानगी, पक्ष कार्यालये उघडण्याची परवानगी,थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय वापर दाखला, ठेकेदार नसल्याचा दाखला, मतदार यादीचा उतारा इत्यादी दाखले आणि प्रमाणपत्र व इतर परवानग्यांची मागणी, त्याचबरोबर अग्निशमन विभाग, स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक विभाग या सर्व विभागांचे ना-हरकत दाखले उपलब्ध एकाच ठिकाणी होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर