कोल्हापूर - काँग्रेसने 48 जणांची पहिली यादी जाहीर केल्याने घटक पक्ष अस्वस्थ
कोल्हापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची 48 जणांची पहिली यादी जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यानी रात्री उशिरा जाहीर केली. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला १२ जागा सोडण्याचे जाहीर केले झाले असले तरी शिवसेना वगळता रा
आ. सतेज पाटील


कोल्हापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची 48 जणांची पहिली यादी जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यानी रात्री उशिरा जाहीर केली. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला १२ जागा सोडण्याचे जाहीर केले झाले असले तरी शिवसेना वगळता राष्ट्रवादी (श. प.) पक्षासह इतर घटक पक्षांकडेही दुर्लक्ष करून काँगेसची पुढील वाटचाल सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत प्रामुख्याने अनुभवी, सक्षम, अशा उमेदवारांचा समावेश केला आहे यामध्ये तब्बल 29 नवे चेहऱ्यानांही संधी दिली आहे. तसेच 16 माजी नगरसेवक यामध्ये तीन माजी नगरसेविकांचा समावेश केला आहे.

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर सुरू असलेली चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही. तरीही काँग्रेसने जवळपास निम्म्याहून अधिक जागांवर आपले उमेदवार घोषित करत बाजी मारताना घटक पक्षांनी आता या जागांवर दावा करू नये असे चित्र निर्माण केले आहे. तथापी शिवसेना ठाकरे गटासोबत जागा वाटप चर्चा सुरू आहे त्या ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

त्यामुळे या जागांवर अजून चर्चा सुरू आहे. यामध्ये ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रवीकिरण इंगवले यांच्या शिवाजी पेठेतील प्रभागाचा सुद्धा समावेश आहे. त्या जागांवर कोणाचा उमेदवार निश्चित होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत महापालिकेच्या राजकारणात अनुभवी आणि प्रबळ असलेल्या बोंद्रे, माने, शेटे या तीन कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे.

माजी नगरसेवक इंद्रजीत बोद्रे यांच्यासह त्यांच्या पत्नी मयुरी बोंद्रे यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे. इंद्रजीत बोंद्रे हे प्रभाग क्रमांक आठमधून लढतील तर मयुरी बोद्रे या प्रभाग क्रमांक 20 मधून लढतील. राहुल माने यांना प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या पत्नी ऋग्वेदा माने यांना प्रभाग क्रमांक आठमधून आली आहे. माजी महापौर उपमहापौर भुपाल शेटे याना प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची मुलगी पूजा शेटे यांना प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

महापालिकेत आ. सतेज पाटील यांच्या गटाचे नेतृत्व करणारे शारंगधर देशमुख काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात गेले आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस कडून राहुल माने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या प्रभागातील तुल्यबळ लढतीवर अवघ्या शहराचे लक्ष असेल.

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन झालेला गोंधळ, ऐनवेळी झालेला बदल त्यातून झालेला वाद आणि त्यातूनही विधान सभेची निवडणूक लावलेले राजेश लाटकर यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे. या बरोबरच संजय मोहिते, मधुकर रामाणे, दीपा मगदूम, जयश्री चव्हाण उमा बनछोडे, अनुभवी माजी नगर सेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसेचे जिल्हाप्रमुख राजू दिंडोर्ले यांना काँग्रेसकडून पुरस्कृत केले आहे. मनसेला राज्यात काँग्रेसचा विरोध असताना कोल्हापूरमध्ये आ. पाटील यांनी मनसे जिल्हाप्रमुखांना उमेदवारी देत बेरजेचे राजकारण केले आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत काँग्रेसची अजूनही बोलणी सुरूच आहे. ठाकरे गटाला 12 जागा निश्चित करण्यात आल्या असून त्यामध्ये सात जागांवर एकमत झालं आहे. मात्र त्या ठिकाणी उमेदवार अजून निश्चित करण्यात आलेले नाहीत.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाराजी कायम आहे. मात्र उमेदवारी जाहीर करताना पाटील यांनी यासंदर्भात कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असणार की नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पक्षाचे नेते अजून अशावादी आहेत पण एकही जागा निवडून येण्याची शाश्वती नसलेल्या पक्षाला बरोबर घेण्यास आ. फारसे उत्सुक नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande