
कोल्हापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)।महाविकास आघाडीत स्थान मिळत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्षाने फारकत घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या तिन्ही पक्षाने मिळून आता राजर्षी शाहू आघाडी म्हणून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली
महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि शिवसेना (ठाकरे गट) संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेऊन जागावाटपाची घोषणा केली. पण यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले वंचित बहुजन आघाडी, आप, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांना स्थान दिले नाही. यामुळे प्रथम आप आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांनी बाहेर पडून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील यांनी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला विचारात घेतले जाणार नाही हे लक्षात आल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनीही अखेर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि आप यादोन्ही पक्षानां बरोबर घेऊन राजर्षी शाहू आघाडी नावाने तिसरी आघाडी स्थापन केली.
या आघाडीच्या वतीने त्यांनी आपसात महानगरपालिकेच्या 81 जागा वाटपाचा फॉर्म्युला ही ठरवून घेतला. याबाबतची घोषणा करताना व्ही. बी. पाटील म्हणाले की आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वी ही महाविकास आघाडीत मी म्हणेल तीच पूर्व दिशा अशा पद्धतीने वागणूक केली आहे. याचा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्यय आला आहे. तीच गोष्ट याही वेळी त्यांनी केली आहे. त्यामुळे आम्ही आता बाहेर पडत आहोत. आता यापुढे सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार कारभार रोखण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. यासाठी आम्ही कोणत्याही उमेदवाराकडून कसलाही आर्थिक व्यवहार करणार नाही. पण निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहोत. आमच्याबरोबर आणखी कोणीही येऊ इच्छिणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाऊ असेही त्यांनी सांगितले. यावेळी आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar