
जळगाव, 27 डिसेंबर (हिं.स.) : धरणगाव नगरपालिकेत धनशक्ती विरूद्ध मिळविलेला विजय हा उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला बळ देणारा आहे, अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नगराध्यक्षा लिलाताई सुरेश चौधरी यांचा गौरव केला. नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी लिलाताईंना आज भेटीसाठी बोलावून घेतले होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, रेखाताई भागवत चौधरी, युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, जिल्हाप्रमुख निलेश चौधरी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातही आदित्य ठाकरे यांनी धरणगाव पालिकेतील विजयाची दखल घेतली. युवा सेनेचे विभागीय सचिव विराज कावडिया यांना निरोप देवून नगराध्यक्षा लिलाताई चौधरी यांना बोलावून घेतले. आदित्य ठाकरे यांचा निरोप मिळताच रात्रीतून नगराध्यक्षा लिलाताई चौधरी, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, रेखाताई चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी तात्काळ नाशिक शहर गाठले. पहाटेच आदित्य ठाकरे यांनी नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व सहकाऱ्यांची भेट घेवून चर्चा केली. स्वबळावर सर्वांना सोबत घेवून धरणगावात मिळविलेला विजयाचे कौतुक आदित्य ठाकरे यांनी केले. निस्वार्थ आणि निष्ठेने पक्षाची ताकद उभी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी आणि सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या समर्पणचा उल्लेख करीत लिलाताई चौधरी यांचा विजय ऐतिहासिक आणि प्रेरणादायक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितले. निवडणूक काळात समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या लिलाताई चौधरी यांच्या अहिराणी भाषणाचा विशेष उल्लेख आदित्य ठाकरे यांनी केला. मातोश्रीवर उध्दव ठाकरे आणि रश्मीताई ठाकरे यांच्यासह आपण हे भाषण पाहिले. मायबोलीत लिलाताईंनी मंत्र्यांचा घेतलेला समाचारांचे मातोश्रीवर सर्वांनाच अप्रुप वाटल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. धरणगावच्या विकासासंदर्भात असलेल्या विविध योजनांची माहिती लिलाताई यांनी आदित्य ठाकरे यांना दिली. भाविष्यात शहरात रोजगार निर्मिती होण्यासाठी एखादा उद्योग उभारणीसाठी शिवसेना आणि ठाकरे कुटूंबियांच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन लिलाताई चौधरी यांनी केले. आपल्या पदग्रहण सोहळ्याचे निमंत्रणही नगराध्यक्षा लिलाताई चौधरी यांनी आदित्य ठाकरे यांना दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर