
कोल्हापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)/
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर आणि संत तुकाराम अध्यासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० डिसेंबर रोजी राजर्षी शाहू सिनेट सभागृह, शिवाजी विद्यापीठ येथे ‘संत साहित्य संमेलन’ होत आहे.
या संमेलनाचा प्रारंभ सकाळी ९ वाजता ‘ग्रंथदिंडीने’ होणार आहे. ग्रंथदिंडीचे पालखी पूजन शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र. कुलगुरू, मा. प्रा. डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथदिंडी पारंपरिक वारकरी भजन, लेझिम आणि झिम्मा फुगडी यांच्या साथीने निघणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता उद्घाटक संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. सतीश बडवे असणार आहेत. तर उद्घाटनसत्राच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी असणार आहेत. उद्घाटन सत्रामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. रणधीर शिंदे, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे असणार आहेत.
संमेलनामध्ये दु. १२.३० ते २ या वेळेत ‘वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादामध्ये श्री. ज्ञानेश्वर बंडगर, श्री. श्रीरंग गायकवाड, प्रा. डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. प्रभाकर देसाई, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. अनिल गवळी सहभागी होणार आहेत. तर परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. प्रमोद मुनघाटे असणार आहेत.
संमेलनामध्ये ३ ते ४ या वेळेत ‘वारी एक आनंदयात्रा’ या विषयावर ज्येष्ठ छायाचित्रकार आणि वारीचे अभ्यासक संदेश भंडारे यांची मुलाखत होणार आहे. या मुलाखतीचे संवादक श्री. ज्ञानेश्वर बंडगर असणार आहेत. सायंकाळी श्री. दत्त भजनी मंडळ, शिपूर यांचे ‘कबीरपंथी भजन’ आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या ‘अभंगवाणी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी संत साहित्य संमेलनामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्रा. नंदकुमार मोरे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar