
लातूर, 27 डिसेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘उदयोत्सव–2025-26’ दिनांक 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत उत्साहात संपन्न होणार असून उद्घाटन समारंभास प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तर समारोपासाठी राम बोरगावकर, तहसिलदार उदगीर हे उपस्थित राहणार आहेत. तरुण विद्यार्थ्यांच्या कला, कौशल्ये आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा 3 दिवसीय महोत्सव सांस्कृतिक, शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रमांनी परिपूर्ण असून विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व पाहुण्यांसाठी तो संस्मरणीय ठरणार आहे. या उदयोत्सवात विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशील विचारांना व्यासपीठ मिळणार असून नृत्य, संगीत, नाटक, वादविवाद, प्रश्नमंजुषा स्पर्धांसह विज्ञान प्रदर्शन व कौशल्याधारित नवोन्मेषी सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने माजी विद्यार्थी व मान्यवरांना या स्नेहसंमेलनात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण 30 डिसेंबर रोजी होणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम असणार असून त्यामध्ये विद्यार्थी कलाकारांचे थेट सादरीकरण सादर होणार आहे. आकर्षक सजावट, स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि आनंदी वातावरणामुळे उदयोत्सव 2025-26 सर्वांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरणार आहे. या उपक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र एज्युकेशन अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis