
जळगाव, 27 डिसेंबर (हिं.स.) वरणगाव नगरपालिकाचे नवनिर्वाचित अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळे यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून त्यामुळे नगराध्यक्ष झालेले काळे काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करत सुनील काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत अपक्ष लढून त्यांनी विजय मिळविल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, भाजपात बंडखोरी केल्यानंतर निवडून आलेले सुनील काळे कोणत्या पक्षात जाणार याबाबत चर्चा आहेत. अशातच पत्रकार परिषदेत मंत्री गिरीश महाजन यांनी सुनील काळे हे भाजपचेच आहेत आणि भाजपचेच राहतील, असे जाहीरपणे सांगितले होते. असे असतानाही काळे यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले.तसेच शिवसेनेत आलात तर निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांना देण्यात आले आहे. सुनील काळे हे भाजपचे तरूण कार्यकर्ते असून त्यांनी नगराध्यक्षपद आधीही सांभाळले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर