
अमरावती, 27 डिसेंबर (हिं.स.) महापालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असली, तरी राजकीय पक्षांचे पत्ते अजूनही गुलदस्त्यात आहेत. उमेदवारांची नावे निश्चित नसल्याने जाहीरनाम्यांची गाडीही वेटिंगवर आहे. मात्र, आश्वासनांची तीच जुनी गाजरे आणि निवडणुकीनंतर मिळणारा विरंगुळा या चक्रात अडकलेला अमरावतीकर जनता आता आक्रमक झाली आहे.
आमच्या प्रश्नांची उत्तरे जाहीरनाम्यात देणार की पुन्हा केवळ स्वप्नच दाखवणार? असा सडेतोड सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील खड्ड्यांनी भरलेले रस्ते, धूळ, प्रदूषण, वाहतूककोंडी, रेल्वे पूल बंद,अतिक्रमण, बंद पथदिवे, बेरोजगारी व इतर विविध समस्यांनी नागरिक हैराण आहेत.
आश्वासनांची खैरात... पण अंमलबजावणीचे काय ?
निवडणूक आली की राजकीय नेते दारात येतान, हात जोडतात आणि स्वप्न दाखवितात. एकदा निवडून आले की जनतेच्या समस्यांकडे ढुंकूनही पाहत नाहीत, हा चंदपूरकरांचा आजवरचा अनुभव आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत. दरवेळी जाहीरनाम्यात मोठे प्रकल्प जाहीर केले जातात, पण जमिनीवर मात्र कचरा, दुर्गधी आणि रखडलेली भुयारी गटार योजनाच दिसते. अतिक्रमण, वाहतूककोंडी, प्रदूषणाचा प्रश्न वर्षोनुवर्षे जैसे थे आहे.
यंदा 'वचन' नव्हे, 'हमी' हवी!
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही. शहरातील प्रदूषणाचे प्रश्न, ई-गव्हर्नन्स, सुसज्ज उद्याने आणि आधुनिक आरोग्य व्यवस्था यावर राजकीय पक्षांचे धोरण काय? हे समजून घेण्यासाठी अमरावतीकर नागरिक उत्सुक आहेत. या संदर्भात ते अपेक्षा व्यक्त करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी