मतदान प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार – ठाणे आयुक्त
ठाणे, 27 डिसेंबर (हिं.स.) : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमबद्ध पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत प्रशिक्षण आयोजित कर
मतदान प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार – ठाणे आयुक्त


ठाणे, 27 डिसेंबर (हिं.स.) : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमबद्ध पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी आदेश प्राप्त होवूनही अनुपस्थित राहिलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 2013 मतदान केंद्रावर एकूण 10120 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर करावयाची कामे, ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण 27 ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत दोन सत्रात राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

तीन दिवस असणाऱ्या या प्रशिक्षणास जे अधिकारी कर्मचारी अनुपस्थित राहतील, त्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रशिक्षण हे निवडणूक कामाचा अत्यावश्यक भाग आहे. प्रशिक्षणाद्वारे मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणी, मॉक पोल, मतदार ओळख प्रक्रिया, आचारसंहिता पालन, आपत्कालीन परिस्थितीतील कार्यपद्धती आदी बाबींचे सखोल मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे प्रशिक्षणास अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब मानली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

निवडणूक ही लोकशाहीची महत्त्वाची प्रक्रिया असून, त्यात नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडणे अपेक्षित आहे. कोणतीही सबब ग्राह्य धरली जाणार नाही. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वेळेत प्रशिक्षणास उपस्थित राहून निवडणूक कामकाजासाठी सज्ज रहावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande