
जळगाव, 27 डिसेंबर (हिं.स.) तालुक्यातील गिरड शिवारात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला असून, ऊस तोडणी सुरू असताना चक्क बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. या घटनेमुळे शेतकरी आणि मजूर वर्गात प्रचंड भीती पसरली असून, वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गिरड येथील शेतकरी नंदू मोतीराम पाटील यांच्या गट क्रमांक १४९ मधील ४ एकर क्षेत्रात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास ऊस तोडणी मजूर कामात व्यस्त असताना अचाकन पिल्लूचे आवाज येत अंसताना सोनु सुरेश नाईक व संजय भिवसन नाईक यांना बिबट्याचे पिल्लु दिसले व त्यांनी शेतमालक नंदू पाटील व रविद्र पाटील यांना कळविले व सदर मालकाने गिरड येथील पोलीस पाटील विनोद मनोरे यांना माहीती दिल्यावर पोलीस पाटील यांनी वनपाल व भडगाव पोलीस पाटील गृपवर माहीती दिल्यावर उस तोड बंद ठेवण्यात आली. यापूर्वीही मागील आठवड्यात गिरड येथील पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता, तर अंतुर्ली आणि भातखंडे परिसरात बिबट्याने गाय व वासराचा शिकार केल्याच्या घटना ताज्या आहेत. सध्या रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली असून सर्वत्र हिरवळ आहे. यामुळे बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत असल्याने तो नेमका कुठून हल्ला करेल, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. जंगली श्वापदाच्या भीतीने शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. निंदणी आणि कोळपणीची कामे सुरू असतानाच बछडे आढळल्याने मजूर वर्गाने शेतात येण्यास नकार दिला आहे. विशेषतः महिला मजूर गटाने कामावर येणे बंद केल्याने शेतीची कामे रखडली आहेत. घटनेची माहिती मिळताच वन क्षेत्रपाल सरीता पाटील याच्या मार्गदर्शन खाली वनपाल नंदू पाटील, वनरक्षक अंभोरे मॅडम, शिवदे, संदीप पाटील आणि वनमजूर छोटू राठोड, सुभाष राठोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाने संबंधित ठिकाणी ऊस तोडणी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्या परिसरात चार ‘ट्रॅप कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत. “परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. आता बछडेही आढळल्याने मादी बिबट्या आसपास असण्याची दाट शक्यता आहे. वनविभागाने केवळ कॅमेरे न लावता तात्काळ पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा.”
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर