
अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.)।
राजकीय वर्तुळात कायम चर्चेत राहणाऱ्या बारामतीमध्ये एका विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब आणि उद्योगपती गौतम अदानी एकत्र पाहायला मिळाले. 'शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस'चे उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, या कौटुंबिक आणि राजकीय भेटीवर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडवून दिली आहे.
पवार कुटुंबियांच्या या एकत्र येण्यावर भाष्य करताना नवनीत राणा म्हणाल्या की, अजित पवार भाजपसोबत गेले, ही शरद पवारांचीच इच्छा होती. त्यांच्या सांगण्यावरूनच हे सर्व घडले आहे. राणा यांनी जुन्या संदर्भांचा दाखला देत म्हटले की, पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांच्याच नियोजनाचा भाग होता. अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन निवडणूक लढवणे आणि मंत्रिपदाची शपथ घेणे, हे सर्व चित्र शरद पवारांनीच तयार केले. आज बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसले, यात नवल वाटण्यासारखे काही नाही, कारण मुळात हे सर्व पवारांच्याच संमतीने सुरू आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी केलेल्या या दाव्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांचे बंड हा शरद पवारांचाच प्लॅन होता का? या प्रश्नावर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून काय प्रतिक्रिया येतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी