
बीड, 29 डिसेंबर (हिं.स.)।मानवजन्म ही एक मौल्यवान देणगी आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यास व्यक्तिमत्त्व घडते. वाईट संगतीमुळे नुकसान होते. अहंकारामुळे माणूस इतरांना कार्यापासून परावृत्त करतो. त्यामुळे चांगल्या संगतीत राहून स्वतःला घडवावे. समाजासाठी चांगले कार्य करावे, असा उपदेश साध्वी प्रतिभा कवरजी म. सा. यांनी केला.त्या बीड येथील तेरापंथ स्वाध्याय भवन, गुजराती कॉलनी येथे श्रावकांना उपदेश करत होत्या. जैन धर्म आराधना प्रवचनमालेच्या सत्रात त्या बोलत होत्या. प्रारंभी परमपूज्य समिती महाराजांनी विचार मांडले. परिस्थिती समजून घ्यावी. त्यात समरस राहावे. त्याच परिस्थितीत सक्रिय राहून शुद्ध व निर्मळ मनाने व्यवहार करावा, असे सांगितले. त्यांनी अकबर-बिरबलाच्या दरबारातील उदाहरण देत प्रत्येकाला त्रास सहन करावा लागतो, हे त्यांनी स्पष्ट केले. मुख्य प्रवचनात साध्वी प्रतिभा कवरजी म.सा. यांनी जीवनातील सुख-दुःखाचे विश्लेषण केले. देह सुख-दुःखाने भरलेला असतो. मात्र माणसाला सुखाचीच अपेक्षा असते.
त्यामुळे दुःख सहन करणे कठीण जाते. पण दुःखातही सुख शोधावे लागते. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.
कर्ता करविता परमेश्वर आहे. मीपणाच्या अहंभावामुळे माणूस स्वतःला कर्ता समजतो. निश्चल मनाने कार्य करावे. कोणत्याही दिखाव्याची गरज नसते. नैसर्गिक रूपच परमेश्वराला प्रिय असते.
समोरील परिस्थिती पाहून कार्य करावे. उलट्या प्रवाहात पोहू नये. मंदिरावरील ध्वज वाऱ्याच्या दिशेने फडकतो.वारे उलटे झाले तर तो ध्वज दंडाला लपेटला जातो. हे ओळखून कार्य करावे. परमेश्वराने दिलेल्या जीवनाचे महत्त्व ओळखून आपले कर्म जोपासावे, असा उपदेश साध्वी प्रतिभा कवरजी म.सा. यांनी प्रवचनाच्या सांगतेवेळी केला. यावेळी भाविक उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis