
बीड, 29 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार येथे 30 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत .आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासोबतच बीड नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यांचा प्रश्नही ते सोडवू शकतात. 31 डिसेंबरला दिवसभर त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
बीड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व १९ नगरसेवक नगरसेवक निवडून आल्यानंतर आता उपनगराध्यक्षपद आणि विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी बहुमत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून आकड्यांची जुळवाजुळव सुरू करण्यात येत आहे.
३० डिसेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडला मुक्कामी येत आहेत. या मुक्कामात ते आकड्यांचे गणित जुळवणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी विविध विकासकामांचा शुभारंभ, आढावा बैठका घेणार आहेत. उपनगराध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती यांच्या निवडीसाठी पुरेसे संख्याबळ राष्ट्रवादीकडे नाही. याचा फायदा घेत क्षीरसागर बंधू एकत्र येऊन बीड क्षीरसागरमुक्त होऊ देणार नाही, या मुद्द्यावर पराभवाचे उट्टे काढू शकतात, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. बीडचे पुढचे सत्तासमीकरण हे आकड्यांच्या खेळात अडकले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे ३१ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता सहकार भवनाचे भूमिपूजन करणार आहेत. पवारांच्या कामाचा धडाका सुरू होईल. नंतर बीड जि.प.च्या काही कामांचे भूमिपूजन होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात काही सादरीकरण, इमारतींची पाहणी, बैठका होणार आहेत.
शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी २ दिवसांपूर्वी पवारांची भेट घेतली होती. स्वीकृत सदस्यांत शिवसंग्रामलाही वाटा मिळणार आहे. शिवसेना या युतीतील घटक पक्षालाही किती जागा द्यायच्या याबाबत निर्णय होणार आहे. राष्ट्रवादीमधूनही कोणाची नावे अंतिम करायची याबाबत उपमुख्यमंत्री पवार निर्णय घेतील.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis