

अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.)
ज्या प्रभागांमध्ये ज्या पक्षाकडे प्रभावी उमेदवार आहे, त्या ठराविक ठिकाणी प्रभागनिहाय आपसी समन्वयाने उमेदवार देण्यावर काँग्रेस-शिवसेनेत (उबाठा) एकमत झाले. दोन्ही पक्षातील सकारात्मक चर्चेचा तपशील उभय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर अंतिम करून या आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व शिवसेनेची (उबाठा) आघाडी करून ही निवडणूक एकत्रितपणे लढण्याचे उद्देशाने माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या पुढाकारातून ग्रॅण्ड महफिल हॉटेल येथे शनिवारी (ता. २७) बैठक पार पडली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे तर शिवसेनेकडून माजी खासदार अनंतराव गुढे, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, महानगर अध्यक्ष पराग गुडधे आदी बैठकीला उपस्थित होते.
उभय नेत्यांमध्ये अधिकृतरित्या झालेली चर्चा सकारात्मक होती. कोणत्या पक्षाने कोणत्या प्रभागात किती जागांवर उमेदवार द्यायचे, मागील निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक होते. किती उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. कोणत्या पक्षाचा कुठे अधिक प्रभाव आहे. कोणत्या प्रभागात कोणत्या पक्ष व उमेदवारासाठी अधिक जनमताचा कौल आहे, इत्यादी बाबींवर या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली.संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये सरसकट आघाडी न करता, ज्या प्रभागांमध्ये प्रभावी उमेदवार आहेत, त्या ठराविक ठिकाणी प्रभागनिहाय आपसी समन्वयाने उमेदवार उभे करायचे, यावर बैठकीत एकमत करण्यात आले. या चर्चेचा तपशील नेत्यांच्या स्तरावर अंतिम करून या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.अमरावती महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी आपसी समन्वयाने सक्षमपणे लढण्याचे दोन्ही पक्षातील नेत्यांनी मान्य केल्याने आता आघाडीचा पुढील मार्ग सुकर झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी