
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात युती झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर, शहराध्यक्ष प्रताप देशमुख, रोहन सामाले आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रवक्ते सूरज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची युती ही नैसर्गिक आहे. जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत थोड्याच वेळात बैठक घेऊन जागा वाटपाची सूत्र निश्चित करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया आज दुपारपर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षा असल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, महायुतीतील भाजप आणि शिवसेना बाबत कुठलेही मतभेद नसून स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनभावनेचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर युती करण्यात आली आहे. या युतीचा महायुतीतील इतर पक्षांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी सांगितले
________
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis