
अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.)।पोलीस आयुक्त कार्यालय क्षेत्रात १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नागरिकांच्या सुविधेसाठी सात ठिकाणी सुरू केलेल्या पोलीस चौक्या गेल्या कित्येक वर्षापासून बंद पडलेल्या सर्व पोलीस चौक्या सुरु करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक यशोदानगर येथील पोलीस चौकीच्या रंगरंगोटीचे काम सुरू करण्यात आले आहे तर काही चौक्यांना अद्यापही कुलूप लागले आहे.
पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पदभार सांभळताच प्रथम शहराचा आढावा घेतला आणि शहरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद केले. त्यानंतर प्रत्येक गुन्हेगारांची यादी अपडेट करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश संबंधित ठाणेदारांना दिले. तसेच प्रत्येक पो-लीस स्टेशनची पाहणी सुरू केलेली आहे. दरम्यान त्यांनी बडनेरा पोलीस स्टेशनची पाहणी केल्यानंतर जुना बायपास मार्गाने शहरात येत असतांना त्यांना यशोदानगर येथील बंद पडलेली पोलीस चौकी दिसली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकीबाबत विचारणा केली तसेच संपूर्ण परिसराची माहिती घेतली.
मनपा निवडणूक लक्षात घेता त्यांनी यशोदानगर येथील पोलीस चौकी सुरु करण्याचे आदेश दिले. आता लवकरच यशोदानगर येथील पोलीस चौकी पुन्हा सुरू होणार आहे. शहरात हिंदू समशान भूमी, भाजीबाजार, साबनपुरा, एमआयडीसी, खोलापुरीगेट, कडबीबाजार याठिकाणी जुन्या पोलीस चौक्या आहेत. परंतु गेल्या काही वर्षापासून सर्व पोलीस चौक्या बंद अवस्थेत पडलेल्या आहेत. केवळ कडबी बाजार येथील पोलीस चौकीमध्ये आधी एसीपी कार्यालय होते. त्यानंतर गुन्हेशाखेचे दोन विभाग करण्यात आले होते. तेव्हा कडबीबाजार येथील पोलीस चौकीमध्ये गुन्हेशाखेचे युनीट दोन सुरु करण्यात आले होते. परंतु गुन्हेशाखा पुन्हा एक झाल्याने कडबीबाजार चौकीकडे कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच भाजीबाजार, एमआयडीसी, साबनपुरा आणि हिंदू म्हशानभूमी येथील पोलीस चौकी बंद असल्याने या परिसरात रात्रीला गुन्हेगारांचा वावर वाढलेला आहे. भाजीबाजार चौकीसमोर गेल्या काही दिवसापूर्वी एका युवकाची हत्या झाली होती. तर एमआयडीसी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असून लुटमारीचे प्रमाणसुध्दा वाढलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी