
रायगड, 3 डिसेंबर (हिं.स.)।
रायगड जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत महिला अत्याचाराशी संबंधित तब्बल 89 अर्जांची नोंद झाली असून घरगुती हिंसा, मानसिक छळ, आर्थिक शोषण आणि कौटुंबिक वाद या प्रमुख कारणांमुळे महिलांनी तक्रारी पुढे केल्या आहेत. या सर्व प्रकरणांवर भरोसा सेलने कारवाई करत अनेक कुटुंबांमध्ये समुपदेशनाद्वारे सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
भरोसा सेलमध्ये आलेल्या 89 अर्जांपैकी 70 महिलांचे सविस्तर समुपदेशन करण्यात आले. पती-पत्नीमधील संवादाचा अभाव, व्यसनाधीनता, आर्थिक ताण, संशय आणि मोबाईलचा अतिरेक वापर ही तणावाची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले. समुपदेशकांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. याचा परिणाम म्हणून अनेक जोडप्यांमध्ये निर्माण झालेला ताण कमी झाला.
समुपदेशनादरम्यान समाधान न झालेल्या आणि गंभीर स्वरूप असलेल्या प्रकरणांमध्ये आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शारीरिक अत्याचार आणि सातत्याने होत असलेल्या मानसिक छळाच्या घटनांमध्ये पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला असून या सर्व प्रकरणांचा तपास सुरू आहे.
सकारात्मक बाब म्हणजे समुपदेशनामुळे 22 जोडप्यांनी परस्पर समझोता करून पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईलचा अतिरेक वापर, सोशल मीडियावरील अनैतिक वर्तन आणि गैरसमजामुळे अनेक वाद उद्भवत असल्याची नोंदही सेलने केली आहे.
एकूण 89 अर्जांपैकी 65 अर्जांची निर्मिती करून चौकशी आणि समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून फाईल बंद करण्यात आल्याची माहिती भरोसा सेलच्या वतीने देण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी समुपदेशन आणि परस्पर संवादाची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके