
अकोला, 3 डिसेंबर (हिं.स.)।
अकोला बस स्थानकावर आज सकाळी मोठा गोंधळ निर्माण झाला. बस लावण्याच्या वादातून दोन बस चालकांमध्ये प्रथम शाब्दिक वाद झाला आणि काही क्षणांतच हा वाद चांगलाच विकोपाला जाऊन हाणामारीपर्यंत पोहोचला. मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसगाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर गाडी लावण्यावरून निर्माण झालेल्या या वादात एका चालकाने तर लोखंडी पाईप उगारत मारहाणीचा प्रयत्न देखील केला.
दरम्यान, हा सर्व प्रकार बस स्थानकातील पोलीस चौकीपासून काहीच अंतरावर घडला असताना त्या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी तैनात नसल्याची खंत उपस्थित प्रवासी आणि नागरिकांनी व्यक्त केली. बस स्थानकावरील सुरक्षेतील ही त्रुटी स्पष्टपणे जाणवत होती.
अखेर प्रवासी आणि उपस्थितांनी पुढाकार घेत मध्यस्थी केली आणि हा वाद शांत केला. दरम्यान, या घटनेमुळे बस स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे