१८ दिवसांची तगमग, अकोला पोलिसांनी आई-वडिलांच्या कुशीत परत आणला १४ वर्षीय मुलगा
अकोला, 3 डिसेंबर (हिं.स.)। अकोला शहरात गेल्या १८ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाचा सुरू असलेला शोध अखेर यशस्वी ठरला.अकोला पोलिसांनी अपार परिश्रम घेत, सात तालुक्यांत शोधमोहीम राबवत हा मुलगा सुरक्षितपणे पंढरपूरहून शोधून काढला.२१ दिवसांन
P


अकोला, 3 डिसेंबर (हिं.स.)।

अकोला शहरात गेल्या १८ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाचा सुरू असलेला शोध अखेर यशस्वी ठरला.अकोला पोलिसांनी अपार परिश्रम घेत, सात तालुक्यांत शोधमोहीम राबवत हा मुलगा सुरक्षितपणे पंढरपूरहून शोधून काढला.२१ दिवसांनी आपल्या आई-वडिलांना भेटलेल्या मुलाला पाहून परिसर क्षणभर भावनांनी भरून गेला. उपस्थितांच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळले. ११ नोव्हेंबरला वडिलांच्या रागामुळे मनात दुखावलेला हा मुलगा घरातून निघून गेला. कुटुंबाने खदान पोलिसात तक्रार नोंदवली होती. सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी पोलिस तपासात मुलगा मनात राग धरून घराबाहेर पडल्याचं स्पष्ट झालं.विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक स्वतः तपासात उतरले. त्यानंतर पोलिसांनी सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलाच्या हालचालींचा मागोवा घेतला. दोन स्वतंत्र पथकांनी राज्यातील सात तालुक्यांत शोधमोहीम राबवली. मुलाकडे मोबाइलसारखं कोणतंही संपर्क साधन नसल्याने तपास अधिक कठीण ठरत होता.

या सर्व प्रयत्नांत निर्णायक धागा मिळाला तो अकोला रेल्वे स्टेशनवर. मुलगा कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीत चढताना दिसला आणि या माहितीच्या आधारे कोल्हापूर आणि पंढरपूर परिसरात त्याचा फोटो देऊन शोध सुरू झाला.अखेर पोलिसांनी मुलाला पंढरपूरहून सुरक्षित ताब्यात घेतलं.

आज मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केलं गेलं. २१ दिवसांनी आईच्या कुशीत विसावलेल्या मुलाला पाहून आई, वडील आणि पोलिसांनाही भावनांचा बांध फुटला. त्या क्षणी सारे वातावरण भाऊक झालं.अकोला पोलिसांच्या या अथक प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत आहे. संयम, तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि मानवी संवेदना यांच्या आधारे एका कुटुंबाला पुन्हा एकत्र आणणाऱ्या पोलिस दलाचे नागरिकांकडून मनापासून अभिनंदन केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande