
श्री गुरू तेग बहादूर यांचे 350 वे शहिदी समागम वर्ष
अकोला, 3 डिसेंबर (हिं.स.)।
गौरवशाली इतिहास सादर करणारा चित्ररथ, बाईकवर उत्साहाने सहभागी तरूण, महिलाभगिनी, आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक तसेच आसमंत दुमदुमून टाकणारा संत, महापुरूष, शूरवीर, हुतात्मे यांचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात 'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर' यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त शहरात भव्य मोटरसायकल रॅली आज काढण्यात आली.
श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त दि. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होणार असून, जिल्ह्यातील शेकडो भाविक नागपूरला जाणार आहेत. त्यानिमित्त अकोला शहरात गुरुद्वारा सिंघ सभा येथून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. प्रारंभी आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते रॅलीला धार्मिक निशाण दाखवून शुभारंभ करण्यात आला. अनेक मान्यवर रॅलीत सहभागी होते. जिल्ह्यातून शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, वाल्मीकि, मोहयाल, सिंधी आदी समाजबांधवांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
शहरात ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. चित्ररथाद्वारे गौरवशाली इतिहास प्रदर्शित करण्यात आला. रेल्वेस्थानक चौक परिसरातून ही रॅली पुढे जिल्हा न्यायालय, सातव चौक, राऊतवाडी चौक, रतनलाल प्लॉट, नेहरू उद्यान, गोरक्षण रस्ता, पुढे कौलखेडवरून सिंधी कँप, अशोक वाटिका, बसस्थानक, चांदेकर चौक, गांधी चौक, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशी जाऊन न्यू राधाकिशन प्लॉट येथे गुरुद्वारा येथे समारोप करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे